पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिसा केवळ २७ एप्रिलपर्यंत वैध असतील. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या व्हिसा योजनेअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर आता भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली असून, हे व्हिसा 27 एप्रिल 2025 पर्यंतच वैध असणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिल्यानंतर, गुरुवारी (दि. 24) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमा मार्गाने परतण्यास सुरुवात झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत त्यांना ‘मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है’ असा थेट इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
पहलगाम हल्ल्यावर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर भाषणाला सुरूवात केली.