दैनिक भ्रमर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना जीएसटी कररचनेत मोठ्या सुधारणांची घोषणा केल्यानंतर आता जीएसटी कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे सरकारी सूत्रांनीही सांगितले आहे. या बदलांमुळे सामान्यांना दिलासा मिळणार की खिसा रिकामा होणार जाणून घेऊया.
पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने जीएसटी कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे वृत्त दिले आहे. या बदलांमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून तंबाखू आणि इतर काही वस्तूंवरील जीएसटी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रस्तावित सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये सामान्य माणसाच्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांवर ५ टक्के कर आकारला जाण्याची शक्यता आहे. तर, चैनींच्या वस्तूंवर, तसेच तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या हानिकारक पदार्थावर ४० टक्के कर लावला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर प्रणाली सुरू झाली. देशात सध्या सोने आणि चांदी व इंधन वगळता बहुतेक वस्तू आणि सेवांवर ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के अशा कर श्रेणीनुसार जीएसटी आकारला जातो. सिगारेट आणि महागड्या गाड्यांवर अतिरिक्त कर लावला जातो. प्रस्तावित सुधारणांचा उद्देश १२ टक्क्यांची श्रेणी काढून टाकणे आणि त्या वस्तूंचे ५ आणि १८ टक्क्यांच्या श्रेणींमध्ये पुनर्वितरण करणे आहे. सप्टेंबर महिन्यात या बदलांना अंतिम स्वरुप देण्यासाठी दोन दिवसांची बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.