महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात विधानसभा निवडणुका संपून महायुतीची सत्ता आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची ही पहिली भेट होत आहे. या भेटीचे कारण आता समोर आले आहे.
पंतप्रधान मोदींना नवी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठीच शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. अशा परिस्थितीत मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण पत्र देण्यासाठी शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
काही दिवसांपूर्वीच यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले होते. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या भेटीत शरद पवार महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांनाही सोबत घेऊन गेले होते. पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील फलटण येथील दोन शेतकऱ्यांसह पंतप्रधानांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या शेतातील डाळिंबाची पेटीही भेट दिली.