आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगले आहे. पक्षप्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहे. रविवारी नाशिक मध्ये सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता उल्हासनगरमधील शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला असल्याच्या सुरु झाल्या आहेत. आगामी काळात उल्हासनगरमधील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार ओमी कलानी यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कलानी समर्थकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची भेट घेतली होती. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. येत्या दोन दिवसांत हे नगरसेवक भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या भेटीत सहभागी असलेले माजी नगरसेवक म्हणजे संजय सिंह (चाचा), सतरामदास जेसवानी, प्रभुनाथ गुप्ता, रवी बागूल, रमेश चैनानी आणि हरेश जग्यासी यांचा समावेश आहे. यावेळी कलानी गटातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ओमी कलानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी बहुतेक माजी नगरसेवक त्यांच्यासोबत होते. मात्र आता त्यांच्यापैकी काहींचा भाजपकडे कल होत असल्याने हा कलानी गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.