राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची आश्वासनं सुरु झाली आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारानं काहिसं हास्यास्पद आश्वासन देत परळीच्या मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय.
दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मी आमदार झालो, तर सर्व पोरांची लग्न लावून देतो, असे आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारांना दिले.
परळीच्या मैदानात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा आमनासामना होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत, तर पवारांच्या राष्ट्रादीकडून राजेसाहेब देशमुळ नशिब अजमावत आहेत. बीडमधील परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना अजब आश्वासन दिले. 'जर उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु' असे अजब आश्वासन बीडच्या परळी मतदारसंघातील राजेसाहेब देशमुखांनी दिले.
काय म्हणाले राजेसाहेब देशमुख?
परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असताना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही? तुमचा कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण मी सर्व पोरांना या ठिकाणी आश्वासन देतो 'जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु' सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी बाबुराव तुमचं लग्न करायचंय.. त्यामुळे आगे बढो असे म्हटल्याशिवाय पर्याय नाही. राजेसाहेब देशमुख यांनी दिलेल्या अजब आश्वासनाची बीडमध्ये आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
शरद पवार गटाने बीड जिल्ह्यात परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.