दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या अपघाताबाबत राजकीय स्तरावर विविध तर्क-वितर्क लावले जात असून घातपाताची शक्यताही काहींकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद आणि नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांची तक्रार करण्यासाठी थेट शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दोन बड्या नेत्यांनी एकाच दिवशी पण स्वतंत्रपणे भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणी संबंधित बड्या नेत्याची पवारांकडे केली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अजितदादा असताना असंकाही घडत नव्हतं. पण आता पार्थ पवार वेगळ्या पद्धतीने पक्ष हाताळत आहेत, असं मत अजित पवार गटाच्या नेत्यांनी पवारांकडे मांडलं आहे. यापूर्वी सुनेत्रा पवारांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरूनही विविध चर्चा रंगल्या होत्या. आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय, असंही मत संबंधित नेत्यांनी पवारांकडे मांडलं आहे.