शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या ''या'' आमदारावर अजित पवार यांच्या गटाकडून मोठी कारवाई !
शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या ''या'' आमदारावर अजित पवार यांच्या गटाकडून मोठी कारवाई !
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांतील नेत्यांच्या इनकमिंग आउटगोइंग ला वेग आला असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार गटासह महायुती साठी हे मोठे धक्के मानले जात आहेत. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले होते. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. सतीश चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. “सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group