महाराष्ट्र झोपेतून उठून आपल्या कामाला निघण्याची तयारी करत असतानाच एखाद्या मोठ्या स्फोटाचा आवाज कानात यावा, अशी बातमी येऊन धडकली. बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, अजित पवार यांच्यासह विमानातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अन् महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दिलदार, दिलखुलास, व्हिजनरी आणि तितक्याच मिश्लील दादा नेतृत्वाच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने हळहळला. अजित पवारांसमवेत या विमानात दोन पायलट यामध्ये कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक , 1 क्रू मेंबर पिंकी माळी आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे.
कर्तव्यदक्ष अन् शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाणारे अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचे निधन
बारामती विमान अपघातात मूळचे साताऱ्याचे असलेले पोलीस विदीप जाधव यांचा यात मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे PSO (Personal Security Officer) म्हणून कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचा आज सकाळी विमान अपघातात अजित पवारांसह मृत्यू झाला. कर्तव्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं पोलीस दलात शोककळा पसरली आहे. विदिप जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहत होते. गेले काही वर्ष अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावलीसारखे नेहमी त्यांच्यासोबत असायचे. एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्यासुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत. जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
लहान भावाला वैमानिक करण्याचं स्वप्न अधुरं ,पिंकी माळी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू
तर आपल्या लहान भावाला वैमानिक बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फ्लाईट अटेंड्ंट पिंकी माळी (२९) यांचा देखील बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. पिंकी माळी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे वरळी – प्रभादेवी परिसरात शोककळा पसरली.वरळी जवळील प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी बाजाराजवळील हसु तांडेल मार्गावरील सेंच्युरी मिल म्हाडा कॉलनीमध्ये पिंकी माली यांचे आई-वडिल वास्तव्याला आहेत. पिंकी माळी यांचे वडिल शिवकुमार माळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून टॅक्सी चालून त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मोठ्या कष्टाने त्यांनी मुलगी पिंकी हिला शिक्षण दिले. इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फ्लाईट अटेंडंटचे प्रशिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्या व्हीसीआर व्हेंचर्स कंपनीत फ्लाईट अटेंडंट पदावर रुजू झाल्या.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार बारामती येथे विमानाने जाणार होते. या विमानात पिंकी माळी यांची नियुक्ती झाली होती. जानेवारीमध्ये पिंकी चौथ्यांदा अजित पवार यांच्या विमानात कर्तव्यावर होत्या. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने वृत्तवाहिन्यांवर विमान अपघाताची बातमी आली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, असे सांगताना शिवकुमार माळी यांचा बांध फुटला आणि अश्रु अनावर झाले. पिंकीला लहान भावाला वैमानिक करायचे होते, त्यादृष्टीने ती त्याच्याकडून तयारी करून घेत होती. पण आता तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे शिवकुमार माळी म्हणाले.