राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जय पवार यांचा या आठवड्यात लग्नसोहळा आहे. नुकताच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा शाही विवाहसोहळा झाला. त्यानंतर पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. जय पवार हे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत.
बहरीनमध्ये तब्बल चार दिवस चालणाऱ्या लग्न सोहळ्याची पत्रिका समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेतील माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी मेहंदी, ५ डिसेंबर रोजी हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा होणार आहे. तर ६ डिसेंबर रोजी संगीत आणि ७ डिसेंबर रोजी रिसेप्शन पार पडणार आहे.या सोहळ्याला केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आल्याची बातमी काही माध्यमांनी दिली आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. त्यानंतर आता ४ ते ७ डिसेंबर या काळात बहरीनमध्ये लग्न होणार आहे. यानिमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसू शकते. तसेच या विवाह सोहळ्याला कोण कोण आमंत्रित असणार याचीही चर्चा होत आहे.
जय यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील कोण आहेत?
अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे. त्या फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहेत.