पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते आणि पदाधिकारी महायुतीमधील पक्षात प्रवेश करत आहे. असे असताना आता शरद पवारांना बालेकिल्ल्यामध्येच मोठा धक्का बसला आहे.
माढ्यातील महत्वाचा शिलेदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय कोकाटे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला. कोकाटे यांच्या या राजीनाम्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कोकाटे यांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर कोकाटे हे नाराज झाले होते.
विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटे यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले होते. परंतु संजय कोकाटे यांनी आता पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कोकाटे आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिट्टी दिल्यामुळे माढ्यात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. संजय कोकाटे यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे माढ्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.