रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा
रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा
img
दैनिक भ्रमर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाच जागावाटपाचा प्रश्न मात्र काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काही जागांबाबत एकमत झाले असले तरीही अनेक जागांवरून मात्र अजूनही रस्सीखेच सुरूच असल्याचे चित्र आहे. अशात आता रामटेक लोकसभा मतदारसंघावर देखील महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी दावा केला आहे. 

अशात आतापर्यंत आघाडीत काँग्रेसकडेअसलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटानेदावा केला आहे. सोबतच रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता माजी आमदार प्रकाश गजभिये यांना शरदचंद्र पवार गटाच्यावतीने उमेदवारी द्यावी असा ठराव देखील कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला आहे.  

माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा रामटेक लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी ठेवला होता. तर, नागपूरचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राऊत व अविनाश गोटमारे यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले. सदर बैठकीचे अध्यक्ष व आयोजन प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख हे होते. यावेळी प्रकाश गजभिये यांच्या नावाला ग्रामीण कार्यकारिणी सदस्य व तसेच युवा कार्यकर्त्यांनी हात उंच करुन प्रस्तावाचे स्वागत केले. तसेच, रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता माजी आमदार प्रकाश गजभिये यांना शरदचंद्र पवार गटाच्यावतीने उमेदवारी द्यावी असा ठराव मंजूर झाला. 

प्रत्येकवेळी रामटेक लोकसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. 2019 मध्ये या मतदारसंघातून आघाडीकडून किशोर गजभिये यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेचे नेते कृपाल तुमाणे यांनी त्यांचा परभव केला होता. तुमाणे सध्या शिंदे गटात असून, यंदाही महायुतीकडून तेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याची चर्चा आहे. असे असतांना महाविकास आघाडीत मात्र, शरद पवार गट आणि काँग्रेस दोन्हीकडून दावा केला जात असल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group