लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि विधानसभेत महायुतीने मोठा विजय साकारला. मात्र लोकसभेतील यशानंतर अतिआत्मविश्वासात राहिलेल्या महविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाली. कशाबशा 47 जागा जिंकता आल्या. काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. ठाकरेंचीही कामगिरी निराशाजनक राहिली. ठाकरे गटाला फक्त 20 आमदार निवडून आणता आले. तर शरद पवार गटालाही जोरदार दणका बसला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच राहिला होता. पण विधानसभा निवडणुकीत या पक्षाला फक्त 10 जागा जिंकता आल्या. आता अशी परिस्थिती झाली आहे की विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडण्या इतपतही संख्याबळ आघाडीकडे राहिलेले नाही. तर आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांची राज्यसभेचीही वाट खडतर झाली आहे.
आघाडीतील दिग्गज नेते शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांना या पराभवाचा सर्वाधिक धक्का बसला आहे. आता या नेत्यांना पुन्हा राज्यसभेत पोहोचणे अधिक कठीण झालं आहे. शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 3 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होत आहे. तर संजय राऊत यांचा कार्यकाळ 22 जुलै 2028 रोजी पूर्ण होणार आहे.
राज्यसभेचं गणित काय?
विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवलं. महायुतीच्या मतांची टक्केवारी 49.6 टक्के इतकी राहिली. तर महाविकास आघाडीला 35.3 टक्के इतकी मते मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने महायुतीची राज्यसभेतील स्थिती अधिक मजबूत होणार आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. सध्या भाजप 7, काँग्रेस 3, शिवसेना शिंदे 1, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी काँग्रेस 3, शरद पवार गट 2 आणि आरपीआय 1 असे संख्याबळ आहे. राज्यसभेत भाजपचे एकूण 95 खासदार आहेत. मित्र पक्षांचे खासदार जोडले तर हा आकडा 112 इतका आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.
जर प्रत्येक आमदाराने मत दिले तर काँग्रेसला 16 मते मिळतील. ठाकरे गटाला 20, आणि शरद पवार गटाला 10 मते मिळतील. समाजवादी पार्टीला 2 तर सीपीआय- एम ला 1 मत मिळेल. महाविकास आघाडीची एकूण मते विचारात घेतली तर ती 50 होतील. दुसरीकडे महायुतीचे 230 आमदार आहेत. यामुळे राज्यसभेत महायुतीची 230 मते होतात.
निवडणूक आयोगानुसार विधानसभेतील एकूण मते/(राज्यातील राज्यसभेच्या जागा प्लस 1) प्लस 1 या फॉर्म्युला नुसार एका उमेदवाराला 15 मतांची आवश्यकता राहिल. आताच्या परिस्थितीचा विचार केला तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट खासदार राज्यसभेत पाठवू शकतात. सध्या राज्यसभेत 7 खासदार आहेत. काँग्रेसचे तीन तर ठाकरे गटाचे 2 खासदार आहेत. शरद पवार गटाचे दोन खासदार आहेत.
20 आमदार असणाऱ्या ठाकरे गटाने पुन्हा संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला तर यासाठी ठाकरे गटाला शरद पवार गट आणि समाजवादी पार्टीच्या पाठिंब्याची गरज राहिल.