शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग, नेमकं काय घडतंय?
शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग, नेमकं काय घडतंय?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याबाबतचं थेट वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं.

जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीत एक मंत्रीपद रिक्त ठेवलं आहे. अधिवेशनानंतर जयंत पाटील काही आमदारांना घेऊन अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा आशयाचं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. ही घडामोड ताजी असताना शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जयंत पाटील यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पत्ता कट होणार असल्याचं बोललं जातंय.लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवला होता. पण विधानसभा निवडणुकीत पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. शरद पवार गटाने ८६ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

मात्र केवळ १० जागांवर शरद पवार गटाचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या ९ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत विविध जागांवर जयंत पाटलांनी इलेक्टीव्ह मेरीट लक्षात न घेऊन तिकीट दिल्याचा आरोप पक्षातूनच केला जात आहे.

एकीकडे, जयंत पाटील महायुतीत सामील होणार असल्याचा दावा केला जात असताना, शरद पवार गटात नेतृत्वबदलाच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता, पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं देखील सांगितलं जातंय. पक्षफुटण्याच्या शक्यतेमुळेच जयंत पाटलांचा पत्ता कट केला जात आहे, अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ९ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group