राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी अजितदादांनी हे वक्तव्य केले आहे. अण्णा बनसोडेंची मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
यावेळी अजित पवार म्हणाले, “कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता लाभला आहे. त्यांनी देशाची मान जगभर उंचावली आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला.”
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
बुधवारी केलेल्या वक्तव्यानंतर आज गुरूवारी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात पार पडणार आहे त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्रित उपस्थित राहणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी टायमिंग साधल्याचेही बोलले जात आहे.