धाराशिव जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निधी न मिळाल्याने पक्षात खदखद पाहायला मिळत आहे. निधी मिळत नसल्याने धाराशविचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा सोपवला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच आता 'निधीचे ग्रहण लागल्याच चित्र दिसत आहे. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत असूनही निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर याच नाराजी पोटी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
धाराशिव मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार खासदार नाही. त्यामुळे पक्ष वाढीसाठी पक्षश्रेष्ठींनी पाठबळ द्यावे, असा सूर सध्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच धाराशिवच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील हे नाराजी नाट्य समोर आल्याने पक्षश्रेष्ठी यातून कसा मार्ग काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.