रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज रोहित पवारांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना बारामती ॲग्रो कंपनीप्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे. त्या संदर्भात आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. तर यावेळी शरद पवार गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून कार्यकर्ते आणि त्यांच्या मतदारसंघातील लोक एकत्रित जमले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आमदार रोहित पवार यांच्यासाठी आजचा दिवस परीक्षेचा आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखलही झाले आहेत.  मात्र, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी त्यांचे आजोबा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचं दर्शन घेतलं. यावेळी आजोबांनी म्हणजे शरद पवार यांनी रोहित यांना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एक पुस्तक भेट दिलं. शरद पवार यांनी एकप्रकारे रोहित यांच्या हातात विचारांचा वारसाच दिला. हा क्षण अत्यंत भावूक करणारा होता. हे दृश्य पाहून सर्वच गहिवरले होते. तेथून ते ईडी कार्यालयात चौकशी साठी रवाना झाले. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत.

रोहित पवार राष्ट्रवादी कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. ईडी आधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. यावेळी "आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही" असे रोहित पवार म्हणाले. यावेळी मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचेही  ते म्हणाले.

दरम्यान रोहित पवार यांच्या समर्थनासाठी कर्जत जांबखेड मतदार संघातून अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनासमोर जमले आहेत. सकाळ पासून कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. डोक्यावर टोपी, गावठी पोशाख, घालून सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा घोषणा ही दिल्या जात आहेत. सरकार आणि केंद्र सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच राष्ट्रवादी भवन समोर आसूड ओढत ईडीचा निषेधही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

दरम्यान ईडी कार्यलयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group