पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण, म्हणाल्या...
पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण, म्हणाल्या...
img
वैष्णवी सांगळे
राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे पवार कुटुंबियांकडून यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येत अत्यंत उत्साहात दिवाळी साजरी करतात. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे कुटुंब असल्याने या कार्यक्रमाला खास महत्त्व असते. 


दिवाळीच्या पाडव्याला अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागवर आवर्जून येतात. या भेटीगाठींच्या कार्यक्रमातून शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. ज्यामुळे या दिवाळीला एक राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते. मात्र यंदा पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करणार नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची माहिती दिली. . सुप्रिया सुळेंनी नुकतंच याबद्दल एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी यंदाच्या दिवाळीबद्दल महत्त्वाची पोस्ट टाकली आहे. आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा, अशी माहिती पवार कुटुंबियांच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group