राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान आत अनेक मोठी बातमी समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पत्र लिहिलेले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांना विराम देऊन निर्णय घ्यावा, असे अंकुश काकडे म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रामवस्थेत आहेत. पण पवारसाहेबांनी परवा काही गोष्टी स्पष्ट करून स्वत: निर्णय प्रक्रियेत नसल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळे यांच्यावर निर्णयाची जबाबदारी टाकली आहे तर त्या काय निर्णय घेतील, याची आताच्या घडीला तरी मला कल्पना नाही. त्यामुळेच मी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.
नेत्या म्हणून सध्याची कार्यकर्त्यांची परिस्थिती त्यांच्या कानावर टाकणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यासाठीच मी पत्र लिहिलेले आहे. १९७८ सालापासून पवारसाहेबांचा छोटा सैनिक म्हणून काम करतोय. पवारसाहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी मी बांधिल असेल. भविष्यातही मी त्यांची साथ कधीही सोडणार नाही. सध्याची आपल्या पक्षाची परिस्थिती आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पाहता नेतृत्वाने निर्णय घेण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून गेली १८ वर्षे काम करतोय. अहमदनगरचे प्रभारी अशोक पवार आणि मी गेल्या आठवड्यातच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. येत्या १४ तारखेला प्रदेशची बैठक आहे. त्या बैठकीत माझी भूमिका स्पष्ट करेन.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. जवळपास १७ वर्षांपूर्वी दूर गेलेल्या ठाकरे बंधूंची एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार तर आत्ताच अडीच वर्षांपूर्वी दुरावले. निवडणूक म्हटल्यानंतर कटुता ही येते. निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे, ही पवारसाहेबांची शिकवण आहे. सुप्रियाताई आणि आम्हाला पवारसाहेबांची शिकवण मान्य आहे. दोन्ही पक्षांत मतमतांतरे आहेत. परंतु हितसंबंधी नेत्यांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते. ते काहीतरी वक्तव्ये करीत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, असेही काकडे म्हणाले.