राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच , “सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. “माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते. डिसेंबरमध्ये लाडकी बहीणच्या लिस्टची स्क्रूटीनी होणार हे कोणाला माहिती होते का हो? मला तर ते माहिती नव्हते. मग यांना कसे कळले?”, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.
दरम्यान, “महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर घरी येऊन पैसे देईन. मतदान आणि स्कीमचा काहीही संबंध नाही. भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयांची किंमत लावली आहे. मी भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं. वर जाताना काय घेऊन जाणार? ‘खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बहिणीला ओवाळणी देणार. अहो देवेंद्रजी तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देताय का?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “जीएसटी घेता, टॅक्स घेता, खत, तांदुळ, हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स घेता, खिश्यातून घेता का?”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.