"त्या" फोटोवरून सुप्रिया सुळेंची टीका , म्हणाल्या डर्टी डझन म्हणणाऱ्या नेत्यांना.....
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी अमित शाह कोल्हापुरात आले होते. त्यावेळी विमानतळावर अजित पवारांचे मंत्री हसन मुश्रिफांनी शाहांची भेट घेतली आणि शेकहँड केला. पण सुप्रिया सुळेंनी डर्टी डझनची आठवण करुन दिली. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

कोल्हापूर विमानतळावरील एका फोटोवरुन सुप्रिया सुळेंनी थेट पत्रकार परिषद घेवून जोरदार निशाणा साधला. डर्टी डझन म्हणणाऱ्या नेत्यांना अमित शाहांनी शेकहँड कसा केला. फाईल क्लीअर झाली असेल तर मुश्रिफांवर खोटे आरोप केले, हे अमित शाहांनी सांगावं, असं सुळे म्हणाल्या आहेत. 

महाविकास आघाडी सरकार असताना डर्टी डझन म्हणत, भाजपच्या किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. ज्यात अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची नावं ट्विट करत, घोटालेबाजो को हिसाब तो देना पडेगा असं सोमय्या म्हणत होते. पण या 12 नेत्यांपैकी 7 जण भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी आहे. 

हसन मुश्रिफांवरुन अमित शाहांवर टीकास्त्र सोडताना सुप्रिया सुळेंनी मुश्रिफांच्या पत्नीचाही उल्लेख केला. अजित पवारांसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याआधीच्या 3 महिन्यांआधी मुश्रिफांच्या कागलच्या घरी ईडीचे छापे पडले होते..त्यावेळी मुश्रिफांच्या पत्नी आम्हालाही गोळ्या घाला अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती…त्याचीच आठवण सुप्रिया सुळेंनी पुन्हा करुन दिली.

तर दुसरीकडे हसन मुश्रिफांचे प्रतिस्पर्धी समजरजित घाटगेंनीही बोचरी टीका केलीय. शरद पवार मुलाप्रमाणं समजत होते. सुप्रिया सुळेही राखी बांधायच्या..पण ईडीतून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मुश्रिफांनी नात्यांचा सौदा केल्याचा जळजळीत वार घाटगेंनी केला आहे.

महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदललीत. ज्यांच्यावर आरोप झाले होते, तेच आता सत्तेत सहभागी झालेत. त्यामुळंच अमित शाह आणि भाजपला त्याच्यांच्या डर्टी डझनच्या टीकेवरुन सुप्रिया सुळे आणि त्यांची राष्ट्रवादी सवाल करते आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group