पुण्यात काका-पुतणे आज आमनेसामने येणार ; राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात काका-पुतणे आज आमनेसामने येणार ; राजकीय घडामोडींना वेग
img
Dipali Ghadwaje
पुणे : शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावून अजित पवार भाजपसोबत गेले. यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अनेकदा कलगीतुरा रंगला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज दुपारी दोन वाजता पार पडणार आहे. 

डीपीडीसीच्या बैठकीत पवार काका-पुतणे समोरासमोर येणार? 
या डीपीडीसीच्या बैठकीचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहे. त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली तर  शरद पवार आणि अजित पवार आज आमनेसामने येतील. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला शरद पवार हजेरी लावणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अजित पवार - शरद पवार एकत्र येणार? 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुती सरकारमध्ये अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येतील, अशाही चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केले होते.  त्यांनी म्हटले होते की, निवडणुका येतात आणि जातात, कुटुंब कायम राहते. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही? हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळात मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group