आज रक्षाबंधनाचा सण असून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्या भावांना ओवाळून राखी बांधत आहेत.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय. त्यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ देखील सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलाय.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री उशिरा त्यांनी दिंडोरी येथे जाऊन भास्कर भगरे यांची भेट घेतली. यावेळी भास्कर भगरे यांना राखी बांधून सुप्रिया सुळेंनी रक्षाबंधन सण साजरा केला.
सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का?
खासदार सुप्रिया सुळे आज दिवसभर नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त त्या येथील वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे या अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधतात. यंदाही त्या अजितदादांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करणार का? याची उत्सुकता अनेकांना आहे.