खासदार सुप्रिया सुळे ठरल्या 'संसद उत्कृष्ट महारत्न' ; सलग दुसऱ्यांदा पुरस्काराने सन्मान
खासदार सुप्रिया सुळे ठरल्या 'संसद उत्कृष्ट महारत्न' ; सलग दुसऱ्यांदा पुरस्काराने सन्मान
img
Dipali Ghadwaje
दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळेयांना प्रदान करण्यात आला. 

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, संसदरत्न अवाॅर्ड कमिटीच्या चेअरपर्सन आणि फाउंडेशनच्या विश्वस्त प्रियदर्शनी राहुल आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार आणि संस्थेविषयी फौंडेशनचे श्रीनिवासन यांनी यावेळी माहिती दिली. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत 16 व्या आणि विद्यमान 17 व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. 

त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण 93 टक्के उपस्थिती लावत 248 चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल 629 प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर 16 खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग आठ संसदरत्न पुरस्कार तसेच संसद महारत्न पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. सुळे यांना आज प्रदान करण्यात आलेला संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा दहा वर्षातून एकदा देण्यात येतो.

सुळे यांच्या दहा वर्षाचा संसदीय कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीचे चेअरमन संसदीय कामकाजमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवड केल्यानंतर आज त्यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group