राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
तसेच येत्या ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. हा राजकीय मुद्दा नाही. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला हवे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा का घेत आहे? हे मला समजत नाही. आपण एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही."
दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी आम्ही या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे, असे उत्तर दिले.