संसदरत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा असल्याचं दिसून आलं. दिल्ली येथे शनिवारी पार पडलेल्या संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा महाराष्ट्राच्या खासदारांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशभरातील एकूण 17 विजेत्यांपैकी तब्बल 7 खासदार महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी संसदेत केलेल्या सक्रिय आणि प्रभावी कामगिरीसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे.
या कार्यक्रमात संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. याशिवाय, चार खासदारांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही त्यांच्या संसदीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं असून, हे विशेष लक्षवेधी ठरलं.
विजेत्या खासदारांची यादी – यंदाच्या संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदारांमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षांचे प्रतिनिधी सामील आहेत:
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मेधा कुलकर्णी (भाजप)
नरेश म्हस्के (शिवसेना)
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना)
स्मिता उदय वाघ (भाजप)
याशिवाय, भाजपचे रवी किशन, प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, आणि दिलीप सैकिया या खासदारांनाही संसदेत त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं.
संसदरत्न पुरस्कार काय आहे?
2010 साली प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या पुरस्काराचा मुख्य उद्देश म्हणजे संसदेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देणे. खासदारांच्या उपस्थिती, चर्चेत सहभाग, प्रश्न विचारण्याची तत्परता आणि कायदेविषयक कार्यक्षमता या निकषांच्या आधारे विजेते निवडले जातात. या वर्षासाठीची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली.