बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने आज (22 जानेवारी) वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडला बुधवारी (22 जानेवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली.
याप्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे बघावे लागेल. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.