बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. तसेच या हत्येमागे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला होता. दरम्यान, प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचे समोर आले, त्यानंतर कराड पोलिसांना शरण आला व त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान , या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली, यात या हत्याकांडाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडने मला मकोकातून दोषमुक्त करा असा युक्तिवाद वकिलांच्या मार्फत केला. आता यावर १७ जूनला पुढील सुनावणी वेळी युक्तिवाद होणार आहे.
आज झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे. वाल्मिक कराडने आज वकिलामार्फत अर्ज करत मला मकोका अंतर्गत दोषमुक्त करा अशी मागणी केली. यावर आता १७ जूनला युक्तिवाद होणार आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या अर्जांवर त्या युक्तिवाद होणार आहे.