संतोष देशमुख हत्या प्रकरण : काळ्या काचा अन् 3 आलिशान गाड्या ; CCTV VIDEO आला समोर
DB
बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी आणि एसआयटीकडून कसून तपास केला जात आहे.
या तपासातून आता नवनवी माहिती समोर येत आहे. आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार पुण्याला कसे पळाले, याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. देशमुखांच्या खुनानंतर आरोपी कुठे कुठे गेले, बीडमधून त्यांनी कसा पळ काढला, याची सगळी माहिती आणि पुरावे पोलिसांकडून गोळा केले जात आहेत.
दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबाबत पुष्टी देणारे काही व्हिडीओज समोर आले आहेत.
ज्यात आलिशान गाड्या मध्यरात्री बीडहून पुण्याकडे रवाना झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना काळ्या काचा होत्या, त्यामुळे आतमध्ये कोण बसलं होतं, याची पुष्टी होऊ शकली नाही.
पण 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाल्यानंतर जवळपास 21 दिवसांनी म्हणजेच 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. या तिन्ही गाड्या बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबल्या होत्या. तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले.
याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1 वाजून 36 मिनिटांनी पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपींनी पोबारा केल्याची चर्चा आहे. तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे वाल्मीक कराड पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून आला ती गाडी देखील याच ताफ्यातील होती , अशी माहिती आहे.