बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्च रोजी सुरुवात झाली असून आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली.
यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्या प्रकरणात सुरुवातपासून नेमकं काय घडलं आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची माहिती कोर्टासमोर मांडली.
पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली खंडणी आणि नंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हे देखील निकम यांनी माहिती देताना सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावत त्यांनी न्यायालयासमोर हत्याप्रकरणचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके हे देखील न्यायालयात हजर होते. या सुनावणीवेळी उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याकांडाशी कसा संबंध आहे हे न्यायालयाला सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबीयांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले. १२ मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट मागितले होते. आजच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीटमधील जबाबाची मागणी केली. या सुनावणीदरम्यान उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील या प्रकरणासंदर्भातील सर्व डॉक्युमेंट न्यायालयापुढे सादर केले. उज्वल निकम यांनी या सुनावणीदरम्यान युक्तीवाद करताना सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे का? वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी मागितली? असे प्रश्न उपस्थित केले.
वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. आवाज ओळखण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये २९ नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते. ८ डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदूर फाटा येथे देखील बैठक झाली. या बैठकीला आरोपी विष्णू, सुदर्शन घुले उपस्थित होते. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा झाली. विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये चर्चा होत असताना त्याला कायमचा धडा शिकवणे गरजेचे आहे असे विष्णू चाटे म्हणाला होता.' असे उज्ज्वल निकम यांनी न्यायालायासमोर सांगितले.
त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. हा युक्तिवाद जवळपास अर्धा तास चालला. या सुनावणीदरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपपत्र आरोपींच्या वकिलांना देण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेमसाठी तयार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.