मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेला मोठा काळ उलटून गेला तरीही अद्यापही अजून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळालेली नाही. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी देशमुख कुटुंबियांनी मस्साजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी सकाळी आंदोलन केले. त्याचवेळी दुसरीकडे खंडणी आणि खुनातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशेष सरकारी वकील हेच सुनावणीला गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने विष्णू चाटे याला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचाच अर्थ विष्णू चाटे याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विष्णू चाटे याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीत आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विष्णू चाटे याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खंडणी आणि खून प्रकरणातील विष्णू चाटे हा अतिशय महत्वाचा आरोपी असून, त्याच्याच मोबाईलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली होती, असे सांगितले जाते. त्याचा फोन पोलिसांना अजूनही मिळालेला नाही. अशा परिस्थितीत त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आणि पर्यायाने त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याने तसेच सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीने अनेक शंका कुशंका उपस्थित होत आहेत. सरकारी वकिलांच्या गैरहजेरीचे कोणतेही कारण समोर येऊ शकलेले नाही.