बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यातील संपिरन राजकारणही ढवळून निघाले आहे. या घटनेला अनेक दिवस उलटूनही या प्रकरणातील आरोपीना अजूनही कठोर शिक्षा देण्यात आली नाही म्हणून सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान , आता सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात ८३ व्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ८३ व्या दिवशी आरोपींवर दीड हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली तसेच तपासी अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील यांनी बीड न्यायालयात दुपारी चार वाजता दोषारोपपत्र दाखल केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मकोका देखील लावण्यात आला आहे. दीड ते पावणे दोन महिन्यांपासून सगळे आरोपी तुरुंगात आहेत
८३ व्या दिवशी चार्जशीट दाखल, सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया
देशमुख यांच्या हत्येच्या ८३ व्या दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. यावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्री फडणवीस यांना धन्यवाद दिले. मकोका, हत्या, खंडणी, अॅट्रोसिटी अशा सर्व प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेली आहेत. गुन्हेगारांवर जर ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही तर संबंधित आरोपी जामिनास पात्र ठरतो. पण बीड प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांना जामिनाचा पर्यायही ठेवला नाही, असे सुरेश धस म्हणाले.