बीड : अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज मंदिराजवळच्या कड्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा एका तरुणीने प्रयत्न केला. सुदैवाने या तरुणीचा जीव वाचला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणीचा जीव वाचवला. या तरुणीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे नाव राधा असे आहे. आज (१२ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास राधा ही घरातून निघून थेट मुकुंदराज टेकडीवर गेली. मंदिराच्या कड्यावरुन राधाने थेट खाली उडी घेतली. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी तात्काळ खाली उतरून युवतीला जिवंत अवस्थेत वर आणले व तिला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
विशेष बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी राधाच्या सख्ख्या भावाने देखील याच मुकुंदराज कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेचा मानसिक परिणाम राधाच्या मनावर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.