ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता.
भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती केली आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते विशेष वकील म्हणून काम पाहू शकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस निकम लढत राहणार?
संतोष देशमुख प्रकरण उज्जवल निकम सरकारी वकील म्हणून लढत होते. त्यामुळे राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ते यापुढेही या प्रकरणावर काम करतील की नाही याबद्दल चर्चा आहे.
याच संदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना उज्जवल निकम यांनी याबाबत भाष्य केलं. राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यामुळे मी संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करु शकतो की नाही, यावर अभ्यास करेन. मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत बोलणार असं, उज्जवल निकम म्हणाले.