अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी बीडमधील वाढती गुन्हेगारीवर मोठं विधान केले आहे. आता सर्व गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच त्यांनी बीडकरांना घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे असं देखील सांगितले.
अजित पवार यांनी गँगला इशारा देत सांगितले की, 'इथे राख, वाळू अशा सगळ्या गँग आहेत. मात्र आता सगळ्या गँग बंद करणार आहे. आता सर्व गँगला सुतासारखे सरळ करणार आहे. तुम्ही घाबरु नका मी आहे. आता विकास कामे करताना रस्ता कागदावर दाखवून पैसे खाईल त्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.
बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार दुसऱ्यांदा बीडमध्ये आले आहेत. अजित पवार बीडमध्ये येत नसल्याच्या टीका अनेक जण करत होते. या टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार एक महिना झाला बीडमध्ये आला नाही असे काही जण म्हणाले. अरे पण मी एक महिना तिथे बसून बजेट करत होतो. सात लाख तीस हजार कोटी हा आकडा मला लिहून दाखवावा. अशा शब्दात त्यांनी विरोधकांना झापलं.
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले, मला शाल- हार घालू नका. मला शाल घालतात कागद तसाच असतो तो खाली पडतो तर हार घालताना कॅरीबॅग तिथेच पडतात. मी आता त्या कॅरी बॅग उचलतो. आताचे पुढारी हे पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. पाया पडले की उगाच लाचार झाल्यासारखे वाटते. - पाया पडण्यापेक्षा रामराम, नमस्कार असे म्हणा.' तसंच, 'प्रवक्त्याने तोलून मापून बोलावं. - कोणत्याही समाजाच्या किंवा पक्षाच्या भावना दुखवता कामा नये. आपण संयमाने बोलावे.', असे आवाहन त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.