मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत,. दरम्यान आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे. तसेच, संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा कट पोलिसांनी रचल्याचा आरोप खुद्द धनंजय देशमुख आणि मस्साजोगकरांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हत्या झाली त्यादिवशी पोलिसांनी वेळीच तक्रार नोंदवली नाही. संतोष देशमुखांचा खून हा आरोपीने केला नसून यंत्रणेने केलेला आहे. त्याचे सर्व पुरावे मी देतो, असे धनंजय देशमुख म्हणाले. मस्साजोगचे ग्रामस्थ देखील संतप्त झाले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत एका ग्रामस्थाने पंचनामा करताना पोलिसांनी कसा निष्काळजीपणा केला, याविषयी सांगितले आहे.
अडीच महिने झाले सगळे नेते भेटीला आले, हत्येच्या दिवशी काय घडलं याविषयी सविस्तर सांगितलं अद्याप आरोपी सापडला नाही. हायटेक यंत्रणा आहे पॉवरफुल अधिकारी नियुक्त केली तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांना त्याचवेळी जर सापळा लावला असता तर आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात असते. पहिला दिवस ते सातवा दिवस पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा दाखवला की ज्या स्पॉटवर चप्पल होती ते देखील उचला म्हणाले नाही. अण्णाची चप्पल आहे हे आम्ही सांगितलं तेव्हा पंचनामा करणाऱ्यांनी ती चप्पल नेली.