मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. मात्र, आता त्याच्या जीवितास धोका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड तुरुंगात काही दिवसांपूर्वी गीते गँग आणि कराड गँग यांच्यात वाद, तणाव आणि मारहाण झाली होती. या घटनेनंतर वाल्मिक कराडवर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन कारागृह प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी सावध भूमिका घेतली आहे. त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला दुसऱ्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, याच प्रकरणात आता एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये वाल्मिक कराडने एका तरुणाशी पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत जातिवाचक अपमानजनक शब्दांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल होत असून, यामुळे प्रकरणाला अधिकच कलाटणी मिळाली आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर वाल्मिक कराडसह इतर काही आरोपींना अटक करण्यात आली होती. आता तुरुंगातील सुरक्षा आणि गँगवॉरमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत असल्याचं चित्र आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , अण्णा नाशिकवरून बोलतोय. मला परत त्या पोलीस स्टेशनवरून फोन यायला लागले आहेत. यावर समोरील व्यक्ती म्हणते, कोणाचा फोन आला होता? मला नंबर टाक. तो नंबर पीएसआय कुलथे सायबर स्टेशन बीड, इथला असलेला सांगतो. हा नंबर समोरील व्यक्ती मागते. 7710006716, असा हा क्रमांक असल्याचं सांगितलं जातं. लगेच या नंबरवर समोरील व्यक्ती कॉल करते. वाल्मिक कराड बोलत असल्याचं सांगितलं जातं. हा फोन कॉल पोलीस निरीक्षण निशीगंधा कुलथे यांना लागतो. ते पोरं काय चिल्लर नाहीत, असा ऑडिओ क्लिपमधील संवाद आहे. सायबर पोलिसांकडून समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू होती. त्यादरम्यान नाशिकमधील मुलावर कारवाई करू नका, असा फोन वाल्मीक कराड यांनी एका महीला अधिकाऱ्याला केला होता. या अधिकाऱ्यासोबत संभाषण संपलं. त्यानंतर वाल्मिक कराडने इथं बाप बसलेला आहोत आपण कशाला घाबरायला लागले, असं धक्कादायक वक्तव्य केल्याचं समोर आलंय. ही कथित ऑडिओ क्लिप वाल्मिक कराडची असल्याचं सांगितलं जातंय.