राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून तेथे त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीडमधील स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेत संवाद साधला.
युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून अजित दादांनी कार्यकर्त्यांना, युवा नेत्यांनाही संबोधित केलं. अनुभवाचे , उपदेशाचे चार बोल ऐकवत अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना काही कानपिचक्याही दिल्या. प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करावे याच्या मार्गदर्शक सूचनाही अजित दादांनी दिल्या.
मात्र या भाषणादरम्यान त्यांनी तूफान फटकेबाजीही केली. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं, असं विधान अजित पवार यांनी केलं. आपल्या यशाचे सर्व श्रेय अजितदादांनी शरद पवार यांनाच दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सुमारे 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते महायुतीत सामील झाले. या फुटीमुळे प्रचंड गदारोळ झाला, खळबळ माजली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं, आणि दोघांमधील अंतर वाढतच गेलं.
लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं. मात्र त्यांचा पराभव झाला. काही काळापासून शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त बऱ्याचदा एका मंचावर आले होते, पण ती फक्त औपचारिकच भेट होती.
मात्र दोन्ही पक्षात पडलेली फूट, मनातील अंतर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी अचानक हे विधान करत शरद पवारांची आठवण काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले अजित पवार ?
युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांनी तरूणांना मार्गदर्शन केलं. युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी युवकांचे संघटन नीट असलं पाहिजे. काही लोक भेटले ते म्हणाले बीडमध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांनी केल्या. मला निवेदन दिलं, मी त्यांना समर्थन दिलं. अधिकारी त्यांचे काम करत आहेत, तुम्ही तुमचे काम करा. गाव पातळीपर्यंत आपलं संघटन गेलं पाहिजे. लोकांच्या फक्त समस्या ऐकू नका, त्यांच्या चर्चांवर मार्ग काढा. त्या समस्या सोडवा, असा सल्ला अजित दादांनी दिला.