वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी धनंजय मुंडेंनीच प्रयत्न केले होते असा धक्कादायक दावा बीड पोलिसांच्या सायबर विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. रणजित कासले हे सध्या निलंबित असून त्यांच्यासंदर्भात खात्याअंतर्गत चौकशी सुरु असतानाच त्यांनी सोशल मीडियावरुन हा धक्कादायक आरोप केला आहे.
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची काही प्रकरणे बाहेर काढण्याची शक्यता असल्याने धनंजय मुंडेंकडून कराडच्या एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक आरोप रणजित कासलेंनी केला आहे. यापूर्वीही कासले यांनी असे अनेक गंभीर आरोप केले होते. कासले यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
दोनच दिवसांपूर्वीच कासले यांनी परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी आली होती असा गौम्यस्फोट स्वतःच्या फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करत केला होता. राज्यातील झालेले अनेक एन्काऊंटर बोगस कसे होते याचाही पाढा कासले यांनी या व्हिडीओथ वाचलेला.
या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान या आरोपांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "त्यांचे असेही म्हणणे आहे की, पोलीस डायरीत नोंद केली आहे त्यामध्ये एन्काऊंटर करण्याच्या सूचना होत्या. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टीची पुष्टी करणारे विधान आहे. पोलीस सांगत आहे ते गंभीर आहे. तेव्हाच कारवाई का झाली नाही?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. "कराड, मुंडे या सगळ्यांचे काम संपल्यावर मारायचे प्लॅन दिसत आहे," असंही राऊत म्हणाले