बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला मोक्का न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज सुदर्शन घुलेची एसआयटी कोठडी संपली होती.
त्यामुळे त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हत्येनंतर आरोपी गुजरातला पळून गेला होता. दरम्यान, त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो आपल्या एका साथीदारांसह पैशे घेण्यासाठी पुण्यात आला होता.
यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तेव्हापासून सुदर्शन घुलेचा विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सीआयडी आणि एसआयटीसह बीड गुन्हे शाखेनं यापूर्वी सुदर्शन घुलेची चौकशी केली आहे.
अलीकडेच, डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुदर्शन घुलेला पाच दिवसाची एसआयटी कोठडी दिली होती. घुलेची एसआयटी कोठडी आज संपली. यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिकद्वारे बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं.
यावेळी सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मात्र या प्रकरणात कधीही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार तपास यंत्रणांना असणार आहे. सुदर्शन घुले हा दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे. पण या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र मागच्या 54 दिवसांपासून फरार आहे. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत.