मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी वाल्मीक कराड सध्या परळी जेलमध्ये आहे. परळी कारागृहात त्याच्या हालचालींबाबत संशयास्पद बाबी आढळल्या. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलविण्याची तयारी सुरू आहे.
बीडमध्ये कराड यांचे घनिष्ठ संबंध असलेल्या धनंजय मुंडे यांचा वरचष्मा आहे.वाल्मीक कराड याच्यावर यापूर्वी प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला झाला होता. आता पुन्हा एकदा वाल्मीक कराड आणि अक्षय आठवले टोळी युद्धांचा भडका उडण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांचा अतिशय क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता. त्या खुनामुळे सबंध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. या खुनातील संशयित म्हणून वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे. वाल्मीक कराड याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांची कनिष्ठ संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
वाल्मीक कराड यांसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे हे अन्य आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी सध्या परळीच्या कारागृहात आहेत. या कारागृहात वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची बडोदास्त ठेवली जाते अशी तक्रार आहे. त्यामुळे यातील काही गुन्हेगारांना नाशिकला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मीक कराड यांची ओळख आहे. संबंध प्रशासनावर आणि पोलिसांवर त्याचा वचक होता. यातून त्याने प्रतिस्पर्धी अक्षय आठवले याचा भाऊ सनी आठवले यांच्यावर मोकाची कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले होते, असे बोलले जाते.
परळी कारागृहात आठवले टोळीच्या सदस्यांनी वाल्मीक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यातून वाल्मीक कराड पोलिसांच्या मदतीने वाचला होता. तेव्हापासून वाल्मीक याच्या संरक्षणासाठी पोलीस कारागृहात विशेष दक्षता घेत आहेत. एक जानेवारीला आठवले टोळीच्या अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांना परळीच्या कारागृहातून नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले होते.
आता वाल्मीक कराडला नाशिकच्या कारागृहात हलविल्यास कराड आणि आठवले टोळीमध्ये पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यात वाल्मीक कराडच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशा कारागृह पोलिसांचा दावा आहे.
वाल्मीक कराडला नाशिकला हलविण्याच्या हालचालींमुळे नाशिकच्या कारागृहात गँगवार भडकण्याची भीती पोलिसांनी गोपनीय अहवालात प्रशासनाला कळविली आहे. याबाबत काय निर्णय होतो ते पाहणं महत्वाचं ठरेल