बीड : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येताना दिसत आहे. संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे तीन मारेकरी अद्याप फरार आहेत. तर या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्कारली आहे.
सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. बुधवारी बीड शहर पोलीस ठाण्यातील एका बंद खोलीत वाल्मिक कराड याची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
अशातच आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे बुधवारी अचानक वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. ते काहीवेळ पोलीस ठाण्यात थांबले, अधिकाऱ्यांशी बोलले आणि त्यानंतर बाहेर पडले.
बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. दरम्यान धनंजय देशमुखांना अचानक पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले की ते स्वत:हून याठिकाणी आले होते, याबाबत चर्चा रंगली होती.
मात्र, धनंजय देशमुख यांनी आपण तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात आल्याचे सांगितले. मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात आलो होतो. मी दोन दिवसांपूर्वीही आलो होतो. तपास कुठपर्यंत आला आहे याबाबतची माहिती मी सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून घेतली. माझ्याकडून काही सहकार्य अपेक्षित आहे का, मी काही मदत करु शकतो का, असे मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारले.
तपास चांगल्या पद्धतीने सुरु आहे. माझं तपास अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. एसआयटीची स्थापना झाल्याचे समजले. एसआयटीत कुठले अधिकारी आहेत याची माहिती घेऊ, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.