वाल्मिक कराड सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. एसटीच्या माध्यमातून बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची चौकशी सुरू असल्याने बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तर विशेष पोलीस पथक या ठिकाणी तैनात केले आहे.
खंडणी प्रकरणात सीआयडीची 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर कराड एसआयटीच्या ताब्यात असून सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सध्या बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाते आहे. याचदरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवासांआधी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या मोबाईलमधील काही सिमकार्ड विदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच या सिमकार्डवरुन काहीजणांना फोनही गेल्याचे सांगितले जात होते. आता विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील विदेशात जाऊन बसलाय, अशी सीआयडीकडे माहिती आहे. वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सीआयडीकडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का? याचा शोध सुरू आहे.