संतोष देशमुख हत्या प्रकरणी आत्ताच एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मोक्का कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली.
कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी 9 ते 10 ग्राउंडस मांडले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसआयटी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं. या तीनही आरोपींमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली.
संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होतं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झाल्याचा दाखला देत सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली.
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली आहे. या गुन्ह्यातले आरोपी सराईत आहेत. त्यांची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहेत.
आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे. तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमकं काय संभाषण झालं हे तपासायचं आहे.
वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू आहे.
आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये इंटरलिंक्स आहेत का? याचा तपास सुरू आहे. फरार आरोपीला अजून सापडायचे आहेत. कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहिती घ्यायची आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहिती घेणं सुरू आहे.
सरकारी वकिलांनी यावेळी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल का केला? याची देखील माहिती कोर्टात दिली. सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर केली आणि त्याच आधारावर वाल्मिक कराडवर मोक्का म्हणजे संघटीत गुन्हेगारीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं स्पष्ट केलं.
आरोपीच्या वकिलाने काय युक्तिवाद केला?
- कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही.
- वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही.
- वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही.
- वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे.
न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
फक्त फोन कॉलवर आरोपीला दोन्ही गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे का? हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का? हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का? असे प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारले.