मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा 'उजवा हात' अशी ख्याती असलेले वाल्मिक कराड यांना मोक्का लागला आहे.
एसआयटी आणि सीआयडीने वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येशी संबंध असल्याचा दावा न्यायालयात केला होता. त्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यातील फोन कॉल पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता वाल्मिक कराड हा खंडणी आणि हत्येचा कट रचणे या दोन गुन्ह्यांमुळे चांगलाच फसला आहे. त्यामुळे साहजिकच राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मोक्का लागलेल्या आणि तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडमुळे खरंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी, भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरली आहे.
आता वाल्मिक कराडला मोक्का लागल्यानं धनंजय मुंडेंची आणखी कोंडी झाली आहे. वाल्मिक कराड याच्याविरुद्ध संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र होऊ शकते.
अजित पवार यांनी याप्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा थेट संबंध नसल्याचे सांगत त्यांना तुर्तास अभय दिले होते. परंतु, सीआयडी आणि एसआयटी तपासात दररोज समोर येत असलेल्या नवनवीन खळबळजनक गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महायुती सरकारची प्रतिमा मलीन होत आहे.
त्यामुळे अजित पवार आता आणखी किती काळ धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी येत असलेला दबाव झुगारत राहणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी दुपारी बैठक आहे. या बैठकीमध्ये उदयोग विभागाचे अनेक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यामध्ये दावोस दौरा आहे. त्याची तयारी आणि प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे.