बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या कोठडीबाबत आज केज कोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. असं असलं तरी एसआयटीने हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा ताबा आपल्याला मिळावा अशी मागणी कोर्टात केली.
विशेष म्हणजे कलम 302 प्रकरणात वाल्मिक कराड याला मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज कोर्टाने वाल्मिक कराड याचा ताबा एसआयटीकडे देण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने त्याच्यावर प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आणि कोर्टाने ते मंजूर केलं. त्यामुळे सीआयडीकडे वाल्मिक कराडचा ताबा मिळाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीसाठी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीबाबत युक्तिवाद केला जाणार आहे.