माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे येऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधून प्रकरण समजून घेतलं.
यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं. मुलीला बारामतीच्या वसतिगृहात पाठवा, मी कॉलेजपर्यंतचं सर्व शिक्षण करतो, असं शरद पवार यांनी जाहीर केलं.
तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेतो, असंही सांगितलं. शरद पवार हे आज बीडच्या मस्साजोग गावात आले होते. त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री राजेश टोपे होते.
यावेळी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमकं काय घडलं होतं? याची माहिती घेतली.
यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतिगृहात शिक्षणासाठी यायला सांगितलं. तिथे 9 हजार मुली शिकत आहेत. तूही ये. तुझा कॉलेजपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका, असं शरद पवार म्हणाले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.