बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मनोज जरांगेदेखील सहभागी झाले होते.
दरम्यान या मोर्चादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केलेल्या भाषणादरम्यान उपस्थित भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
"आमचा आनंद हिरावून घेतला आहे. आम्ही तुमच्या पाठिंब्यामुळे हा लढा पुढे नेत आहोत. आमच्या कुटुंबाच्या पाठिशी राहा. आमच्या पाठीमागे कायम राहा माझ्या वडिलांची छळ करून का हत्या केली," असं सांगताना वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले.
यावेळी तिने पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशी आर्त हाकही दिली. यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावेळी भाषण केलं.
यावेळी ते म्हणाले की, "जगात सगळं दिसत पण माझा भाऊ मला दिसत नाही. माझ्या भावाचं काय चुकलं, 20 वर्ष सेवा केली हे चुकलं का.? या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा करा.
सीआयडीच्या हाती एक व्हाईस सॅपल लागले आहे, ते मॅच झाले आहे. आमच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ द्या. आपल्या भावाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकण्याची ही मुख्यमंत्र्यांना संधी आहे".
दरम्यान यावेळी निवेदन वाचताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
"वाल्मिक कराड याच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करावे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, या कुटुंबाला 1 कोटींची मदत करावी. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं," असं निवेदन वाचण्यात आलं.