मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गोटातील आमदार, खासदारांनी नैतिकतेच्या मुद्दावर त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला आहे.
तर केवळ चर्चेवर कारवाईस दादांनी नकार दिला आहे. ठोस पुराव्याशिवाय त्यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर अजितदादांनी धनुभाऊला अभय दिले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे त्यांच्या कामाने आले होते. मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.