"वडिल पुन्हा आणू शकत नाही, पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये ; वाल्मिक कराडच्या अटकेनंतर देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया
img
DB
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस वाल्मिक  कराडच्या शोधात होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. त्याला अटक करण्यात यावी, यासाठी मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं होतं.  अशात आज 31 डिसेंबररोजी वाल्मिक कराड स्वतः पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे.  

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आला असून सध्या त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाची प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाल्या वैभवी देशमुख?

“आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. पोलीस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय? आरोपींना पकडायला इतका वेळ का लागतोय? मग, आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार?”, असे सवाल वैभवी देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

“माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली, त्यांना अटक करा. जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना अटक करा. लवकरात लवकर न्याय द्या” अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.

वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात शरणागती पत्करलीय, असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं त्यावर वैभवी देशमुख म्हणाल्या की, “आम्हाला एवढच वाटतय की, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करा. वडिल पुन्हा आणू शकत नाही. पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांच एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असतील, त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी” 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group