मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून आता या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी तपास करत आहेत. दरम्यान आता या प्रकरणाला दार दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी तर संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्यावेळी एक स्विफ्ट कारही होती, असा दावा केला आहे. सोनवणे यांच्या या नव्या दाव्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? त्यांना नंतर घर कोणी राहायला दिले? या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील. खंडणीमधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात राहत होते, कोणी गाड्या पुरवल्या हे पोलीस तपासात सगळे समोर येईल. परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची टोळी निर्माण झालीय, असे नवनवीन दावे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत देशमुख यांचे अपहरण झाले ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून अशी माहिती होती. पण याच स्कॉर्पिओबरोबर एक स्विफ्ट कारही होती असा दावा करून खासदार सोनावणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.